गावाविषयी माहिती

चांदोरी  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील प्रभू श्री.राम  यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.चांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व चांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार लागतो. मात्र, ती गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. टर्ले-जगताप वाडा आता नाही, परंतु ते ठिकाण लोकांच्या मनी पक्के बसले आहे. किंबहुना चांदोरी प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक वाड्यांमुळे.गावाला तसा इतिहासही आहे. गावात नव्या इमारती दिसतात, पण त्या जुन्या घरांसमोर खुज्या वाटतात. महादेव भट हिंगणे हे पेशव्यांचे नाशिक येथील क्षेत्रोपाध्ये होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान यांनी महादेव भट हिंगणे यांना 1718 मध्ये दिल्लीस नेले. पेशवे दिल्लीहून परत आले तेव्हा त्यांनी भरवशाचा माणूस म्हणून महादेव भट हिंगणे यांची वकील म्हणून दिल्लीच्या वकिलातीवर नेमणूक केली.तेव्हापासून नाशिकचे हिंगणे राजकारणात मान्यता पावले. दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. त्या संबंधांचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर मराठी वकिलातीचे महादेव भट यांच्या रूपाने पहिले पाऊल पडले होते. त्यांना पेशव्यांचे पहिले कारभारी असेही म्हटले जाते. पेशव्यांनी महादेव भट यांच्या एकनिष्ठ कारभारावर खूश होऊन त्यांना मौजे चांदोरी, खेरवाडी, नागपूर व धागूर ही गावे इनाम म्हणून 1730 मध्ये दिली. पेशवाईत सरदार महादेवभट हिंगणे, देवराम महादेव हिंगणे व बापूजी हिंगणे यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बापू हिंगणे हे पानिपतच्या लढाईत नानासाहेब पेशव्यांबरोबर होते.

गणेश हिंगणे यांनी छपन्न खोल्यांचा प्रशस्त वाडा चांदोरीत 1762 मध्ये बांधला. हिंगणे यांचे काही वाडे झाशी येथे व नाशिकमधील भद्रकालीतही आहेत. हिंगणे यांच्याकडे दहा हजार एकर भूभागाची जहागिरी 1953 पर्यंत होती. ब्रिटिशांनी सरदार राजेबहादूर, सरदार विंचूरकर व सरदार हिंगणे यांचीच सरदारकी नाशिक जिल्ह्यात मंजूर केली होती. चांदोरी परिसरात जमीन व महसुल यांची मालकी ही हिंगणे यांच्याकडेच होती. त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारा चांदोरीतील हिंगणे वाडा तो इतिहास उलगडून सांगतो. हिंगणे वाड्यातील अनेक वस्तू रशिया-ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात आहेत.

चांदोरीतील हिंगण्यांचा वाडा, मठकरी वाडा, हिंगमिरे वाडा पाहण्यासारखे आहेत. त्याखेरीज टर्ले वाडा जमीनदोस्त झाला आहे. टर्ले म्हणजे मूळचे जगताप. त्यांच्याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते, की जगतापांच्या घरी मूल जगत नसल्याने त्यांनी वंश जगावा म्हणून खेडभैरव (तालुका इगतपुरी) येथे बकऱ्याचा बळी देऊ असा नवस केला होता. तेव्हापासून टर्ले-जगतापांच्या सर्व पिढ्या तो नवस फेडण्याची परंपरा पाळतात. गावातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र चंद्रकोरीसारखे असल्याने गावाला चंद्रावती असे नाव पडले अन्‌ पुढे झाले चांदोरी म्हणे!

गावातील बुद्धविहार, लाकडात नक्षीकाम असलेली चावडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या इमारतीत येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. मठकरी वाड्यातील दक्षिणाभिमुख राममंदिर व तेथील रामजन्मोत्सव महाराष्ट्रात आगळेवेगळे आहेत. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती कायम अधांतरी (चौपाळ्यावर) असतात.वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्चितम पिंडी हा त्या मंदिराचा विशेष आहे. रामाने मृगवेध त्या मंदिरातूनच घेतला; तसेच, रामाचे पाऊल तेथे उमटल्याचा दाखला अशा पुराण कथा मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. रामनवमीला तेथे मोठी मिरवणूक असते. मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची जुनी चित्रे आहेत. मठकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मीळ आहेत.

चांदोरी चिरेबंदी वाड्यांसाठी ओळखले जाते. तसेच, ते महाराष्ट्रात फक्त चांदोरी (व त्र्यंबकेश्वबर) येथेच इंद्राच्या एकमेव मंदिरासारख्या वैशिष्ट्यपूर्ण मं‌दिरांसाठीही ओळखले जाते. मठकरी वाड्यातील राममंदिराजवळ 1852 मध्ये बांधलेले दत्तमंदिर आहे. वाड्यामागील उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिरही जागरूत समजले जाते. सरदार हिंगणे यांच्या वाड्यातील देवी ही कोल्हापूरच्या देवीचे अधिष्ठान मानले जाते. गोदेच्या कुशीत बुडालेली मंदिरे हे चांदोरीचे वैशिष्ट्य आहे. पाण्यात राहूनही ती हेमाडपंती मंदिरे सुस्थितीत आहेत. शंकराची ती बारा मंदिरे आहेत. त्यामुळे त्यांना बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती मानली जातात. पंचमुखी महादेवाचे दुर्मीळ मंदिर हेही विशेष होय. ती मंदिरे अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे म्हटले जाते. नदिपात्रात अनेक मूर्ती बेवारसरीत्या पडलेल्या पाहण्यास मिळतात. त्या मूर्तींचे संकलन करून गावात वस्तुसंग्रहालय उभारल्यास तो ऐतिहासिक वारसा जपला जाऊ शकतो. नदीकाठावरील खंडेरायाचे मंदिर प्रतिजेजुरी समजली जाते. जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर तेथील मंदिरात आल्यावरच नवस फेडला जातो अशी प्रथा असल्याने तेथे नेहमी वर्दळ असते. खंडोबा, भैरवनाथ व सप्तशृंगी या देवतांच्या गावातून निघणाऱ्या रथयात्राही पाहण्यासारख्या असतात. गावात बोहाड्याची परंपरा होती, मात्र ती कालांतराने बंद पडली. प्रसिद्ध नारायण महाराजांची संजीवन समाधी नदीकिनारी आहे. चांदोरीत अनेक संत-महात्मे येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील वाड्यासारखे दिसणारे विठ्ठल मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे विठ्ठल-रूक्मिणी व राईबाई यांची मूर्ती पाहण्यास मिळते. तेथील भिंतीवर चित्र असून त्या मंदिराची देखभाल भन्नसाळी कुटुंब करते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् दिल्लीपर्यंत पराक्रम गाजवणाऱ्या माणसांची तेजस्वी चांदोरीची ओळख लोककलावंत माधवराव गायकवाड यांच्याशिवाय अपुरी ठरेल. माधवराव गायकवाडांचे नाव आजही तमाशा क्षेत्रात आदराने आणि गुरूस्थानी घेतले जाते. एकदा दादासाहेब फाळके आपल्या मॉरिस गाडीतून माधवराव गायकवाडांना त्यांनी चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. माधवरावांनी मात्र तमाशाच आपली जान आणि शान असल्याचे सांगत फाळकेंना नकार दिला होता. त्यांनी लोककलावंत म्हणून केलेली कामगिरी अजरामर ठरली. त्यांचा 1987 मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रताप गायकवाड वडिलांची परंपरा ‘तमाशा कलावंत’ म्हणून पुढे नेत आहे. चांदोरी नावामागील एक वलय म्हणजे मल्हारराव होळकरांच्या चांदवड टांकसाळीत चांदीचा रुपया तयार होत असे. त्याला ‘चांदोरी रुपया’ म्हटले जायचे.त्याचा चांदोरीशी थेट काही संबंध नसला तरी पराक्रम आणि कामगिरीने लखलखणाऱ्या चांदोरीची भुरळ अनेकांवर पडत असते हे मात्र नक्की

सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १४५९९ आहे.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ८,अंगणवाडी केंद्रे १४.माध्यमिक शाळा १,कनिष्ट महाविद्यालय २,कॉलेज १ व व्यायामशाळा १,सभामंडप-३,PHC उपकेंद्र १, गावातील समाज मंदिर/सामाजिक सभागृह/मंगल कार्यालय :-समाज मंदिर १,मंगल कार्यालय ८,अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. पुरातन व हेमाडपंथी मंदिरे,सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण,सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील उपलब्ध आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा,सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात.द्राक्ष  ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात.

चांदोरी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुलचा  लाभ मिळाला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चांदोरी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.माझी वसुंधरा अभियान ०.२ व ०.४ मध्ये  चांदोरी विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनमार्फत प्राप्त झालेला आहे.स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका  पातळीवर मिळाला आहे.

ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व १८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

चांदोरी गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

चांदोरी हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १४ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ  ७०० हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ६ वार्ड आहेत. एकूण अंदाजे ३१०० च्या आसपास  कुटुंबे  येथे वास्तव्यास असून,लोकसंख्या  सद्यस्थितीत २२००० च्या आसपास आहे.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत गोदावरी नदी असून यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो.येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे.उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते,तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते.पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

चांदोरी गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

चांदोरी गावाचे लोकजीवन साधे,श्रमप्रधान व पारंपरिक आहे.शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष,ऊस,कांदा,मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात.वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा सप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो.तसेच गावात दर्स्वर्शी प्रामुख्याने बोहडा साजरा केला जातो.गणेशोत्सव,होळी,दिवाळी,नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.येथील लोक मेहनती,मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत.स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण,खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

चांदोरीच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते,ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

तपशील  एकूण पुरुष महिला
एकूण लोकसंख्या १२,५९४ ६,६०६ ५,९८८
बाल लोकसंख्या (०–६ वर्षे) १,५१२ ८६१ ६५१
अनुसूचित जाती (SC) ५३८ २८६ २५२
अनुसूचित जमाती (ST) २,५३६ १,२६८ १,२६८
साक्षर लोकसंख्या ९,२३० ५,१३१ ४,०९९
निरक्षर लोकसंख्या ३,३६४ १,४७५ १,८८९

संस्कृती व परंपरा

चांदोरी गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे.येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात भैरवनाथ महाराजाची यात्रा हि माहे पौर्णिमेला  मोठ्या उत्साहात २ दिवस भरवली जाते. त्यात प्रामुख्याने कावड रथ मिरवणूक हे आकर्षण आहे,गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात.या सणांमुळे गावातील मुलं,तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला,कीर्तन,भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो.पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग  ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे चांदोरी गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत भैरवनाथ महाराज मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

शेती क्षेत्र व द्राक्षबागा-चांदोरी द्राक्ष उस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

चांदोरी गाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे चांदोरीशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

सायखेडा,नागापूर,मौजे सुकेना),नारायणगाव,गोंडेगाव,रामाचे पिंपळस हि गावे चांदोरीच्या आसपासची प्रमुख गावे आहेत.